आरोग्य विभागातील बदल्यांमध्ये आणणार पारदर्शकता! : मंत्री प्रकाश आबीटकर
🗓️ ८ जानेवारी २०२६ I 📍मंत्रालय, मुंबई आरोग्य विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या पारदर्शकपणे राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (SHSRC) च्या मुल्यांकन प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित होणार! सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध प्रशासकीय विषयांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील समिती सभागृहात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, बढती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (State Health Systems Resource Centre-SHSRC) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याची सूचना केली. तसेच केंद्र शासनाच्या ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (NHSRC)’ च्या धर्तीवर पुणे येथे कार्यरत असलेले ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (SHSRC)’ ही संस्था राज्याच्या आरोग्य विभागास तांत्रिक सहकार्य, संशोधन व गुणवत्ता वृद्धीसाठी महत्त्वाचे कार्य करत आहे. SHSRC मार्फत जिल्हा व महापालिका स्तरावरील आरोग्य संस्था तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून प्रशासकीय, तांत्रिक व वित्तीय निकषांवर आधारित मासिक रँकिंग तयार केली जाते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्या व बढत्या करताना या कामगिरीआधारित रँकिंग अहवालाचा आधार घेतला जाणार असून कार्यक्षमता व जबाबदारीला प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे आरोग्य सेवा प्रशासन अधिक परिणामकारक व लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी CSR अंतर्गत निधी उभारणीस चालना देणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. यासाठी संबंधित विभागांनी CSR देणाऱ्या संस्थांना उद्दिष्टाधारित व स्पष्ट प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (DPM), जिल्हा लेखा व्यवस्थापक (DAM), एनएचएम सल्लागार व कार्यक्रम अधिकारी यांनी आरोग्य संस्थांना नियमित भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा व आवश्यक सुधारणा सुचवाव्यात, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर पदभरती, मानव संसाधन व्यवस्थापन व क्षेत्रीय भेटींच्या अहवालांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई.रवींद्रन, आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक श्री. राजेंद्र भालेराव, सहसंचालिका डॉ. सुनीता गोल्हाईत, सहसंचालिका डॉ. सरिता हजारे, माजी महासंचालक व सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. मोहन जाधव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागातील बदल्यांमध्ये आणणार पारदर्शकता! : मंत्री प्रकाश आबीटकर Read More »










