नागरिकांसाठी तिमाही महाआरोग्य शिबिरांचे आयोजन – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

नागरिकांसाठी तिमाही महाआरोग्य शिबिरांचे आयोजन – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मालेगाव: तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा व्यापक लाभ मिळावा आणि त्यांना एकाच ठिकाणी उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने तिमाही महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे आयोजित बैठकीत या उपक्रमाची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाशिक विभागाचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. पंकज दाभाडे, विभाग प्रमुख डॉ. तुषार मोरे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीप पगार, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री आहेर यांच्यासह मालेगाव येथील विविध खाजगी आणि शासकीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध

महाआरोग्य शिबिरांमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेषतः गंभीर आजार असलेल्या रुग्णांना तातडीने आवश्यक उपचार मिळावेत यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवांचा लाभ दिला जाणार आहे. तसेच, निदानानंतर आवश्यक त्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी संबंधित रुग्णालयांमध्ये मोफत वा सवलतीच्या दरात उपचार मिळावेत, यासाठी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे.

आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर

या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची सुविधा मिळणार आहे. आरोग्य विभाग, अंगीकृत रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार असून, याचा थेट लाभ ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मिळणार आहे.

जनजागृतीसाठी व्यापक प्रचार मोहिमेची योजना

महाआरोग्य शिबिरांबाबत अधिकाधिक नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी व्यापक प्रचार आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय संस्था यांच्या समन्वयातून या उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.

— विशेष प्रतिनिधी, मालेगाव

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top