महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत मोठे पाऊल; बालकांमधील गंभीर आजार आणि मानसिक आरोग्यासाठी विशेष उपक्रम!

बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण व मानसिक आरोग्य बळकटीसाठी महत्त्वपूर्ण करार

मुंबई | ८ एप्रिल २०२६:

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) नियंत्रण तसेच मानसिक आरोग्य क्षेत्रात समुदायाधारित सेवा बळकट करण्यासाठी हे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

पहिला करार एम्स, नागपूर बालरोग विभागासोबत करण्यात आला असून, राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहुड एनसीडी क्लिनिक्स स्थापन व कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून टाईप-१ मधुमेह, जन्मजात हृदयरोग, दमा, स्थूलता, सिकलसेल, मानसिक आरोग्य आणि विकासात्मक विकार यांसारख्या आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मानकीकृत उपचार पद्धती, डेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे. डॉ प्रशांत जोशी, एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक, डॉ. मीनाक्षी गिरीश, बालरोग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

दुसरा करार एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ, पुणे यांच्यासोबत करण्यात आला असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केअरगिव्हर-लेड सेल्फ हेल्प ग्रुप्स (एसएचजी)च्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवा अधिक व्यापक करण्याचा उद्देश आहे. ऑफलाइन आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे, जनजागृती वाढवणे आणि मानसिक आजारांबाबतचा कलंक कमी करणे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम (डीएमएचपी) सोबत समन्वय साधून राबवला जाणार आहे. एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थचे संस्थापक-संचालक, डॉ. प्रा. अनिल वर्तक, उपाध्यक्ष प्राची बर्वे, सचिव स्मिताताई गोडसे, खजिनदार मंजिरी चव्हाण, आजीवन सदस्य संध्या वर्तक यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आलेले हे दोन्ही करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित असणार आहेत. या करारांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत गुणवत्ता, उपलब्धता आणि सर्वसमावेशकता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानसभा सदस्य श्री. नानाभाऊ पटोले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव विलास बेंद्रे यांच्या उपस्थितीत हे दोन्ही सामंजस्य करार करण्यात आले.

या करारांचे महत्त्व का आहे?

पुढील ३ वर्षांसाठीची रोडमॅप: हे दोन्ही करार आगामी ३ वर्षांसाठी लागू असतील, ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेत दीर्घकालीन सुधारणा अपेक्षित आहेत.तज्ज्ञ मार्गदर्शन: एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी आणि डॉ. मीनाक्षी गिरीश यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्हा स्तरावरील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारेल.

समुदायाचा सहभाग: एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. अनिल वर्तक आणि त्यांच्या टीमच्या सहकार्याने मानसिक आरोग्य सेवा घराघरात पोहोचण्यास मदत होईल.

निष्कर्ष : राज्यातील बालकांचे भविष्य सुरक्षित करणे आणि मानसिक आरोग्यासारख्या संवेदनशील विषयाला मुख्य प्रवाहात आणणे, या दृष्टीने हे दोन्ही करार मैलाचा दगड ठरणार आहेत. यामुळे केवळ उपचारच नाही, तर प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवरही भर दिला जाणार आहे.

#PrakashAbitkar #PublicHealth #MaharashtraHealth #MentalHealthMatters #NCDPrevention #ChildHealth #AIIMSNagpur #EklavyaFoundation

#prakashabitkar #HealthMinister #mentalhealthawareness #NCDPrevention #PublicHealthInitiative

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

Scroll to Top