महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना शंका व समाधान #MJPJAY #Fact
या कोरोना काळात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अत्यधिक चर्चेत आली. चर्चा होते तेव्हा ती उलट-सुलट असे दोन्ही प्रकारांची असते. बरेच वेळा असं होतं की या उलट सुलट चर्चा व त्यांचे अवडंबर यांमुळे सत्य झाकोळलं जातं आणि हेच सत्य उजागर करणं गरजेचं असतं. तर चला आज जाणून घेऊया काय आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व कसा मिळवावा या योजनेचा लाभ प्रश्नोत्तरांच्या साह्याने….. प्रश्न : योजनेतून पैसे मिळवण्यासाठी बिलं कुठे सादर करायची? उत्तर : या योजनेमधून रुग्णांना प्रत्यक्ष पैसे दिले जात नाहीत त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी प्रतिपूर्ती अर्थात परतावा मिळविणे करिता कोणत्याही प्रकारे बिल सादर करण्याची आवश्यकता नसते. प्रश्न : मग योजनेचा लाभ कसा मिळेल? उत्तर : योजनेचा लाभ हा कॅशलेस स्वरूपात मिळतो अर्थात योजनेमध्ये समाविष्ट आजारांवर मोफत उपचार केले जातात. प्रश्न : मग सरकार ने दिलेले योजनेचे पैसे आमच्या खात्यावर कसे टाकले जातील? उत्तर : शासनातर्फे रुग्ण अथवा रूग्णांच्या नातेवाईकांच्या बँक अकाऊंट मध्ये अशा प्रकारे कोणतेही पैसे जमा केले जात नाहीत. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत उपचार दिले जातात व त्या बदल्यात रुग्णालयांना प्रतिपूर्ती अर्थात क्लेम दिला जातो. प्रश्न : हॉस्पिटल वाले आमच्या खात्यातून कितीही पैसे काढून घेतील ना मग? उत्तर : असे करणे शक्य नाही. रुग्णावर उपचार करण्यापूर्वी हॉस्पिटल ला यासंबंधी योजनेची पूर्वपरवानगी घ्यावी लागते व ती पूर्व परवानगी मिळताना विशिष्ट पॅकेजच्या स्वरूपात विशिष्ट रकमेची पूर्व परवानगी दिली जाते व त्यानंतर रुग्णालय ज्यावेळेस प्रतिपूर्ती अर्थात क्लेम सादर करतात त्यावेळेस संपूर्ण कागदपत्रांची पुरेपूर तपासणी करूनच रुग्णालयांना पॅकेज रकमेपैकी ची योग्य ती रक्कम दिली जाते. प्रश्न : आम्ही उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलचे बिले हॉस्पिटलने कोणाकडे सादर करायची? उत्तर : ही योजना ज्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे अर्थात जी रुग्णालय योजनेशी जोडली गेली आहेत अशाच रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ दिला जातो. अश्या योजनेशी जोडलेल्या हॉस्पिटल ने ऑनलाईन पद्धतीने पूर्वपरवानगी मिळविणे, उपचार केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे व क्लेम सादर करणे अशी ऑनलाईन प्रणाली द्वारे प्रक्रिया राबवायची असते. प्रश्न : कोणत्या हॉस्पिटल मध्ये ही योजना आहे हे आम्हाला कसे कळेल? उत्तर : आपल्या शहरातील अथवा आपल्या आसपासच्या रुग्णालयांची माहिती मिळविण्यासाठी आपण www.jeevandayee.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकता अथवा 155388 / 10882332200 या मोफत अर्थात टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपण ही माहिती मिळवू शकता. तसेच आपण ज्या रुग्णालयात गेले आहात त्या रुग्णालयात योजना उपलब्ध आहे अथवा नाही याबद्दल चौकशी करू शकता. योजनेत संलग्नित असलेल्या रुग्णालयांमध्ये योजनेसंबंधी बॅनर्स लावलेले असतात व योजनेचे मदत केंद्र उपलब्ध असते जिथे योजनेची माहिती देण्यासाठी व नाव नोंदणी करण्यासाठी योजनेचे आरोग्य मित्र उपलब्ध असतात. प्रश्न : योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? उत्तर : योजनेचा लाभ घेण्यासाठी मुळ शिधा पत्रिका अर्थात रेशन कार्ड व कोणतेही शासकीय ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. प्रश्न : हे कागदपत्र कोणाकडे द्यायचे? उत्तर : योजनेअंतर्गत जोडले गेलेल्या रुग्णालयांमध्ये जर रुग्ण भरती असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो व त्यासाठी रुग्णाला भरती करतेवेळेस अथवा भरती केल्यानंतर लगेचच योजनेच्या मदत केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या आरोग्य मित्रांकडे कागदपत्रे जमा करणे आवश्यक असते. आरोग्य मित्र या कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदवून घेतात मूळ कागदपत्रे आपणास वापस करतात. प्रश्न : कागदपत्रे सोबत आणले नसतील तर योजनेचा लाभ भेटणार नाही का? उत्तर : जर उपचार करण्यास वेळ असेल तर कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते परंतु उपचार तातडीचे असतील व उपचार लगेच सुरू करणे आवश्यक असल्यास रुग्णालयास योजनेच्या विहित नमुन्यात एक हमीपत्र देणे आवश्यक असते ज्यामध्ये विशिष्ट कालावधीत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांनी आश्वासन दिलेले असते अशा परिस्थितीत या हमीपत्राच्या आधारावर रुग्णालय तात्काळ उपचार सुरू करते व रुग्ण आता त्याच्या नातेवाईकांनी कागदपत्रांची मुदतीत पूर्तता करणे आवश्यक असते अन्यथा योजनेचा लाभ बाद केला जातो. प्रश्न : योजनेचा लाभ सगळ्या आजारांवर मिळतो का? उत्तर : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 आजारांसाठी प्रति वर्ष प्रति कुटुंब दीड लाखापर्यंत पॅकेज आधारित पद्धतीने लाभार्थी कुटुंबांना लाभ दिला जातो यामध्ये कुटुंबातील एक व्यक्ती कितीही वेळा किंवा अनेक व्यक्ती कितीही वेळा दीड लाखाची मर्यादा संपेपर्यंत लाभ घेऊ शकतात. तर जे लाभार्थी प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत अशा लाभार्थी कुटुंबांना अतिरिक्त 213 आजारांसाठी अतिरिक्त 3.5 लक्ष रुपयांचा प्रतिवर्ष प्रति कुटुंब अर्थात एकूण 1209 आजारांसाठी प्रति वर्ष प्रति कुटुंब पाच लक्ष रुपयांपर्यंत लाभ दिला जातो. प्रश्न : हॉस्पिटलने चुकीची माहिती दिली अथवा लाभ नाकारल्यास काय करावे? उत्तर : सदरील माहिती आरोग्य मित्रांकडून तपासून घ्यावी व शंकेचे समाधान न झाल्यास योजनेच्या जिल्हास्तरीय अधिकार्यांशी संपर्क साधावा. प्रश्न : योजनेच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक कुठे मिळतील? उत्तर : रुग्णालयातील योजनेच्या मदत केंद्रावर योजनेच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक लावलेले असतात अथवा आरोग्य मित्रांकडून अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळणे सहज शक्य आहे अथवा योजनेच्या टोल फ्री क्रमांकावर अथवा वेबसाईटवर अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळू शकतात. प्रश्न : योजनेमध्ये अजून काय काय मोफत मिळते? उत्तर : योजनेअंतर्गत ठराविक पॅकेजेस मध्ये संपूर्ण मोफत उपचार दिले जातात यामध्ये औषधी, ऑपरेशनचा खर्च, भूल तज्ञांची सुविधा इत्यादी बाबींचा समावेश आहे. या सोबत आवश्यक तपासण्या, रुग्णासाठी रुग्ण रुग्णालयात भरती असे पर्यंतचे जेवण व सार्वजनिक वाहतूक नियमानुसार एक वेळचा रुग्णाच्या परतीच्या प्रवासाचा भत्ता मोफत दिला जातो. प्रश्न : कोरोना आजारावर चे उपचार योजनेमध्ये आहेत का? उत्तर : होय 23 मे 2020 रोजीचे शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत वीस पॅकेजेस च्या माध्यमाने कोरोना आजारावर उपचार लागू करण्यात आले आहेत. या उपचारांमध्ये महागडी औषधे व कोरोना संबंधी वैयक्तिक सुरक्षा साधने व इतर बाबींचा समावेश नाही. प्रश्न : हॉस्पिटलने आम्हाला माहिती दिली नाही अथवा आमच्याकडून जास्तीचे पैसे घेतल्यास आम्ही तक्रार कुठे करायची? उत्तर : रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या मदत केंद्रावरील आरोग्य मित्रांकडे आपण सदरील तक्रार नोंदवू शकता अथवा योजनेच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदरील तक्रार नोंदविता येते याव्यतिरिक्तही जिल्ह्याच्या योजनेसंबंधी जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव या नात्याने आपण मा. जिल्हा शल्य चिकित्सक व अध्यक्ष या नात्याने मा. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातही सदरील तक्रार नोंदविता येते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना शंका व समाधान #MJPJAY #Fact Read More »
