राजमाता महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
खाद्यपदार्थांसह आयुष्मान भारत ई-केवायसी स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी
बुलढाणा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे आयोजित राजमाता महोत्सव नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गजबजला आहे. जिजामाता प्रेक्षागार व क्रीडा संकुलात भरवलेल्या या महोत्सवात शनिवारी, सुट्टीच्या दिवशी, नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावली. या महोत्सवातील आकर्षक स्टॉल्स आणि वैविध्यपूर्ण पर्यायांमुळे हा महोत्सव खवय्यांसाठी खास पर्वणी ठरत आहे.
महिला बचत गटांचे स्टॉल्स – चविष्ट पदार्थांची मेजवानी
महोत्सवात विविध महिला बचत गटांनी आपल्या स्टॉल्सवर पारंपरिक व आधुनिक खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. खास करून ग्रामीण व पारंपरिक पदार्थांचा स्वाद घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. विविध प्रकारच्या पाणीपुरी, चटकदार चाट आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून येत आहे.
आरोग्य जागरूकतेसाठी ‘आयुष्मान भारत’ स्टॉल्स
महोत्सवात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘म. ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत आरोग्य मित्र व आशा सेविका यांनी नागरिकांसाठी ई-केवायसी (e-KYC) नोंदणी सेवा उपलब्ध करून दिली. २६३ लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली, तसेच त्यांना योजनांची माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत १३५६ गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळतात याची माहिती नागरिकांना देण्यात आली.
नैसर्गिक उत्पादने आणि घरगुती वस्तूंच्या स्टॉल्सना भरघोस प्रतिसाद
खाद्यपदार्थांशिवाय महोत्सवात गहू, तांदूळ, भाजीपाला, मसाले आणि अन्य घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे स्टॉल्स आकर्षण ठरत आहेत. नागरिक या स्टॉल्सवर खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत.
महोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण
राजमाता महोत्सवामुळे बुलढाण्यात उत्साहाचे वातावरण असून, स्थानिक उद्योजक, महिला बचत गट आणि नागरिक यांच्यात सकारात्मक ऊर्जा संचारली आहे. सुट्टीच्या दिवशी हा महोत्सव अधिकच गजबजला असून, येत्या दिवसांत याला आणखी चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

