मुख्यमंत्री सहाय्यता निधी
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. याअंतर्गत नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष” सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील शासन निर्णय २२ जानेवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
नागरिकांना मोठा दिलासा नवीन निर्णयानुसार, नागरिकांना आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. जिल्हा स्तरावरच अर्ज सादर करणे, त्यांची सद्यस्थिती जाणून घेणे, तसेच अर्जांवर आवश्यक कार्यवाही करणे शक्य होणार आहे. यामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल. याशिवाय कक्षामार्फत अर्ज भरण्यास मदत, अर्जावरील स्थितीबाबत माहिती देणे आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पूर्णतः पेपरलेस प्रणाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रक्रियेला पूर्णतः पेपरलेस करण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी आणि आर्थिक मदतीसंदर्भात अर्जदारांना त्वरित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली सुरू होईल. या प्रक्रियेमुळे नागरिकांना सेवा अधिक सुलभपणे आणि वेगाने मिळणार आहे.
तज्ञ समितीची स्थापना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांचे पुनर्विलोकन होणार असून, गरजेनुसार नवीन रुग्णांना मदतीचा समावेश करण्यात येईल. याशिवाय, उपचार खर्चाचा आढावा घेतला जाईल आणि आर्थिक मदतीची रक्कम नव्याने निश्चित केली जाईल.
“सीएमआरएफ पोर्टल” आणि “चॅरिटी पोर्टल”चे एकत्रिकरण रुग्णालये आणि नागरिकांना सेवा अधिक सुलभ व्हावी यासाठी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी ऑनलाईन प्रणाली” (सीएमआरएफ पोर्टल) आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) यांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. अर्जांची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी एओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र जोडले जातील.
सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आजवर हजारो गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य मिळाले आहे. या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना त्यांच्या उपचारांसाठी नवा आशेचा किरण प्राप्त झाला आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ गरजू रुग्णांनी अधिकाधिक प्रमाणात घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याच्या या प्रयत्नामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.


