मुलींना मोफत कॅन्सर लस; राज्य सरकारचा मोठा निर्णय

० ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) लस मोफत देण्याचा निर्णय

देशभरात आणि राज्यात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील ० ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमाव्हायरस) लस मोफत देण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे भविष्यात महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णसंख्येत घट होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, “शहरी तसेच ग्रामीण भागातही कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी व्यसनांमुळे कॅन्सर होतो, असे मानले जात होते. मात्र, आता जीवनशैलीतील बदलांमुळे लहान मुलांनाही कॅन्सर होत आहे, ही चिंतेची बाब आहे.”

स्तनाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण

WHO ची कॅन्सर संस्था आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) च्या अहवालानुसार, २०५० पर्यंत स्तनाच्या कॅन्सरचे निदान आणि मृत्यू मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, दर मिनिटाला एका महिलेचा मृत्यू ब्रेस्ट कॅन्सरमुळे होत आहे.

लस कधीपासून उपलब्ध होणार?

महिलांसाठीची ही कॅन्सर प्रतिबंधक लस पुढील ५ ते ६ महिन्यांत उपलब्ध होईल, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. या मोफत लसीकरण मोहिमेमुळे कर्करोग रोखण्यात मोठे यश मिळू शकते, अशी आशा आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाची पावले:

  • ० ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस मोफत दिली जाणार.
  • स्तनाच्या कॅन्सरचा धोका रोखण्यासाठी हा मोठा निर्णय.
  • २०५० पर्यंत दरवर्षी ३२ लाख नवीन रुग्ण आणि १.१ दशलक्ष मृत्यू होण्याची शक्यता.
  • पुढील ५ ते ६ महिन्यांत लस उपलब्ध होणार.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिला आरोग्यासाठी नवा अध्याय सुरू होणार आहे.

Scroll to Top