अवयवदान पंधरवडा २०२५ निमित्त जळगाव जिल्ह्यात जनजागृती शपथ कार्यक्रम संपन्न, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव |
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने अंगदान – जीवन संजीवनी अभियान अंतर्गत ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयवदान पंधरवडा साजरा केला जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव येथे अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी व जिल्हास्तरीय समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते होते. त्यांच्यासह जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाबळे, आरोग्य विस्तार अधिकारी विजयकुमार विंचू, पीएचएन श्रीमती विद्या राजपूत, आरोग्य निरीक्षक राजेश कुमावत व संतोष मोरे तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्य सहाय्यक (HA) व आरोग्य सहाय्यिका (LHV) यांचा उपस्थितीत सहभाग नोंदविण्यात आला. या वेळी डॉ. रमेश धापते यांनी अवयवदानाचे सामाजिक व वैद्यकीय महत्त्व विषद करत उपस्थितांना जागरूकतेचा संदेश दिला. त्यांनी अवयवदानामुळे कित्येक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, याचे प्रभावी उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी अवयवदान शपथ घेऊन या सामाजिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या सर्व पातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन समाजात अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचा वचने दिली.
अशा प्रकारच्या उपक्रमामुळे समाजामध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक विचारांची पेरणी होऊन अधिकाधिक लोक या पवित्र कार्यात सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.

Scroll to Top