दुर्गम भागातील आरोग्य क्रांतीचा अनुभव!

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील चातगाव येथे असलेल्या ‘सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’ (शोधग्राम) येथे सदिच्छा भेट देऊन तेथील आरोग्य सुविधा, प्रशिक्षण पद्धती आणि समुदाय सहभागाच्या उपक्रमांची बारकाईने पाहणी केली. या भेटीदरम्यान पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांच्याशी राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील सुधारणांबाबत सखोल चर्चा केली. प्रामुख्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्यासमोरील आव्हाने, शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि दुर्गम भागातील आरोग्य क्रांतीला नवी दिशा देणारं ‘गडचिरोली मॉडेल’ संपूर्ण राज्यभर राबविण्याबाबत यावेळी सकारात्मक संवाद झाला.

याप्रसंगी डॉ. अभय बंग यांनी जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती दिली. ज्यामध्ये दुर्गम भागातील प्रभावी सर्वेक्षण, तात्काळ निदान आणि स्थानिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या मदतीने उपचार या त्रिसूत्रीचा समावेश आहे. हिवताप शून्यावर आणण्यासाठी राज्यभर ‘टास्क फोर्स’ पद्धतीचा अवलंब करण्याबाबतही गांभीर्याने विचारविनिमय करण्यात आला.

तसेच, राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यासाठी शोधग्रामने विकसित केलेल्या ‘गृहआधारित नवजात अर्भक संगोपन’ या पद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात आला. नवजात शिशूंची घरच्या घरी तपासणी, मातांमधील जागरूकता आणि तातडीची वैद्यकीय मदत यामुळे बालमृत्यू दरात झालेली घट अत्यंत लक्षणीय आहे.

यावेळी डॉ. राणी बंग यांच्याशी स्त्री-रोग समस्या आणि दारूबंदीच्या सामाजिक प्रभावावर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, आरोग्य विभागामार्फत नव्याने सुरू होणाऱ्या ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाचे डॉ. अभय बंग यांनी विशेष कौतुक केले.

शोधग्राममधील उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, डॉ. बंग दांपत्याने सुचवलेल्या उपाययोजनांचा वापर करून राज्यातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

️ १४ फेब्रुवारी २०२६ |शोधग्राम, गडचिरोली

@ChivateMangesh

#prakashabitkar #HealthMinister  #healthrevolution #InclusiveDevelopment  #HealthcareForAll

Scroll to Top