पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीची ‘आयुष्यमान भारत’ योजना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ यांचा समन्वय
नाशिक: समाजातील गरीब आणि गरजू लोकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकत्रितपणे काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेल्या ‘आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ यांच्या माध्यमातून आरोग्याचा अधिकार प्रत्येकाला मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सहकार्याने, नाशिकमधील भाजपा प्रणित श्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाने ‘श्री गणेशा आरोग्याचा’ आरोग्य अभियान २०२५ चे आयोजन केले आहे.
हे आरोग्य महाशिबिर रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नाशिकच्या इंदिरानगर भागात होणार असून, यामध्ये हजारो गरजू नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ मिळणार आहे. या शब्दात शिबिरात मोफत आयुष्यमान कार्ड बनवून देण्यात येणार आहे.
शिबिराची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उपलब्ध सेवा
या शिबिरात विविध क्षेत्रांतील तज्ञ डॉक्टरांचे पॅनेल उपस्थित असणार आहे, ज्यात जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अस्थिरोग, बालरोग, हृदयरोग, नेत्ररोग, त्वचारोग, स्त्री रोग, दंतरोग आणि कॅन्सर यांसारख्या विविध रोगांवर तपासणी केली जाईल. शिबिरात येणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रक्त, लघवी आणि ई.सी.जी. यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्या पूर्णपणे विनामूल्य केल्या जातील.
या शिबिराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, तपासणीनंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असेल, त्यांच्यासाठी ‘आयुष्यमान भारत’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत इंदिरानगर येथील रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या भव्य अभियानासाठी आयोजक अॅड. श्याम धर्मराज बडोदे, डॉ. कुलदीप शिरपूरकर (क्षेत्रीय व्यवस्थापक, आयुष्यमान भारत योजना) आणि डॉ. चैतन्य बैरागी (प्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी) यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

