

आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. ओमप्रकाश शेटे यांना प्रतिष्ठित ‘महासागर महाराष्ट्र भूषण’ सन्मान प्रदान; नागपुरात पत्रकारांसाठी विशेष आयुष्मान कार्ड नोंदणी शिबिर संपन्न
नागपूर, २३ ऑगस्ट २०२६:
महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आणि आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश सदाशिव शेटे यांना दैनिक ‘महासागर’च्या वतीने प्रतिष्ठित ‘महासागर महाराष्ट्र भूषण सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नागपूर येथील वनामती संस्थेच्या वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित ‘जलसमृद्ध विदर्भ २०३५ – संकल्प संवाद’ या विशेष सोहळ्यात आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह जी आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या औचित्यावर डॉ. शेटे यांच्या पुढाकारातून उपस्थित पत्रकार बांधवांसाठी आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विशेष आयुष्मान कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अविरत समाजसेवेचा सन्मान:
डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी १९९६ पासून सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घेत २००२ पासून राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी अविरत लढा दिला आहे. राज्याच्या धर्मादाय उच्चाधिकार तपासणी समितीचे सदस्य (२०१५ ते २०१९) म्हणून त्यांनी गरजू रुग्णांच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात साहाय्यक सचिव आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी आरोग्यविषयक कार्याची दखल घेत दैनिक ‘महासागर’चे समूह मुख्य संपादक व संचालक श्रीकृष्ण चांदक आणि समूह संपादक संदीप काळे यांच्या वतीने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकारांसाठी थेट आयुष्मान कार्ड निर्मिती सुविधा:
पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांच्या आरोग्याला संरक्षण देण्याच्या उद्देशाने विशेष नोंदणी स्टॉल उभारण्यात आला होता. “आरोग्य धन संपदा हा रयतेचा अधिकार – जन आरोग्य योजना हा जनतेचा आधार” या ब्रीदवाक्यानुसार, उपस्थित पत्रकारांना केवळ माहिती न देता प्रत्यक्ष आयुष्मान कार्ड तयार करून देण्यात आले. शिबिरात आधार कार्ड व रेशन कार्ड नोंदणीच्या आधारे लाभार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य कवच मिळवून देण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात आली.
आरोग्य यंत्रणा व आरोग्यमित्रांचे सक्रिय योगदान:
या शिबिराच्या नियोजन व यशस्वी अंमलबजावणीसाठी आयुष्मान भारत योजनेच्या प्रशासकीय पथकाने प्रत्यक्ष उपस्थित राहून समन्वय साधला. यामध्ये:
* उपस्थित अधिकारी: क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. कुलदीप शिरपूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. विश्वदीप नगरकर, क्लस्टर हेड पियुष चाफेकर आणि दक्षता व्यवस्थापक श्री. शिवचरण पेठे.
* आरोग्यमित्र: प्रत्यक्ष कार्ड निर्मिती आणि तांत्रिक समन्वयाची जबाबदारी आरोग्यमित्र दीक्षा कुत्तरमारे, आदित्य थुबाळकर आणि राहुल कराडे यांनी पार पाडली.
सामाजिक बांधिलकी, आरोग्यसेवेचा सन्मान आणि प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांपर्यंत योजना पोहोचविणारा हा सोहळा नागपुरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला
